इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः भारतातील सणांचा हंगाम नुकताच संपला आहे. लग्नसराई सुरू झाली आहे. २३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२३ दरम्यानच्या लग्नाच्या हंगामात ३८ लाखांहून अधिक लग्न होतील असा अंदाज आहे. एवढ्या मोठ्या संख्येने होणाऱ्या विवाहांमुळे ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ (कॅट) या व्यापाऱ्यांच्या गटाने या वेळी सुमारे ४.७४ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
नोव्हेंबर-डिसेंबर २०२२ च्या लग्नाच्या हंगामात देशभरात ३२ लाखांहून अधिक विवाह झाले. या काळात सुमारे ३.७५ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. व्यापाऱ्यांना या वर्षी बंपर व्यवसायाची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर देशभरातील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नफा कमावला आहे. लग्नसराईच्या हंगामात यंदा देशाच्या विविध भागांत एकूण ३८ लाखांहून अधिक विवाहसोहळे होणार असल्याची व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत या लग्नसराईच्या हंगामात व्यवसायात प्रचंड वाढ दिसून येईल आणि एकूण व्यवसाय ४.७४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे.
‘कॅट’चे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी माहिती दिली, की या लग्नाच्या मोसमात एकट्या राजधानी दिल्लीत चार लाखांहून अधिक लग्न होतील. अशा परिस्थितीत या माध्यमातून एकूण १.२५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय अपेक्षित आहे. यासोबतच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या लग्नसराईत एक लाख कोटींचा अधिक व्यवसाय अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.