इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत आभासी जी-२० शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हेही या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. ही आभासी जी-२० नेत्यांची शिखर परिषद संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून होणार आहे आणि त्यात जागतिक नेते सहभागी होतील.
आभासी परिषदेत अनेक प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. क्रेमलिनने अधिकृत निवेदनात म्हटले आहे, की आज पुतिन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या जी-२० शिखर परिषदेत सहभागी होतील. माहितीनुसार, शिखर परिषदेतील सहभागी २०२३ मध्ये भारताच्या अध्यक्षपदाचा आढावा घेतील आणि जागतिक अर्थव्यवस्था आणि वित्त, हवामान अजेंडा, डिजिटलायझेशन आणि इतर विषयांवर चर्चा करतील. ११ आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांना आमंत्रित केले आहे. आफ्रिकन युनियनच्या अध्यक्षांसह सर्व जी-२० सदस्यांच्या नेत्यांना, तसेच नऊ अतिथी देश आणि ११ आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे.
या परिषदेत दुसऱ्या ‘व्हॉईस ऑफ द ग्लोबल साउथ समिट’च्या चर्चेचाही समावेश केला जाईल. मोदी यांनी ‘ग्लोबल साऊथ’च्या देशांसाठी ‘ग्लोबल सेंटर ऑफ एक्सलन्स’चे उद्घाटन केले. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे, की आभासी जी-२० शिखर परिषदेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांसह विविध जी-२० निर्णयांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला जाईल अशी अपेक्षा आहे.