इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याच्या राजकारणात महायुती व महाविकास आघाडी असे दोन गट तयार झाले आहे. पण, या गोंधळात या दोन्ही गटाच्या मित्रपक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहे. एकमेकांविरुध्द लढलेले नेत एकत्र येतील का असा प्रश्न आहे. त्यात उमेदवाराची घोळ मात्र कायम आहे. अहमदनगरमध्ये असाच पेच पुन्हा उभा राहणार आहे. या लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या एका आमदाराने आता निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण, महायुतीत असलेल्या भाजपचा या ठिकाणी विद्यमान खासदार असल्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण होईल का हे पुढील काळातच स्पष्ट होईल.
पारनेरलचे आमदार नीलेश लंके यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची फार दिवसांपासूनची इच्छा आहे. त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. खा. डॉ. सुजय विखे यांच्याविरोधात लढण्यासाठी त्यांना शरद पवार यांनीच तयार केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आ. लंके हे अजित पवार यांच्यासोबत गेल्याने लोकसभा निवडणुकीत ते उतरणार नाहीत, अशी चर्चा होती; परंतु आ. लंके यांनी नगर लोकसभा मतदारसंघातून खा.विखेयांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
आ. लंके हे पारनेर विधानसभा मतदारसंघातील आठ हजार मुस्लिम बांधवांसोबत खेड शिवापूर येथील हजरत कमरअली दुर्वेश दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांनी एकत्र यावे, अशी इच्छा व्यक्त केली. आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का,या प्रश्नावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. गेल्या आठ वर्षांपासून आ. लंके मतदारसंघातील महिलांना नवरात्रीमध्ये मोहटा देवी दर्शनाला घेऊन जात असतात. या वर्षी त्यांनी मुस्लिम नागरिकांना खेड शिवापूरच्या दर्शनासाठी नेले होते.