इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंढरपूरः कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा वाद मिटल्यानंतर आता पंढरपूरला मोठ्या संख्येने वारकरी येणार आहेत, हे लक्षात घेऊन समितीने कार्तिकी यात्रेसाठी दहा लाख लाडू बनविले आहेत.
यंदा विक्रमी कार्तिकी यात्रा भरण्याचे अंदाज असून आज नवमीला गोपाळपूर येथील ९ पत्रा शेड भाविकांनी भरून गेली आहेत. दर्शनाला येणाऱ्या भाविक वारी करून परत जाताना लाडूचा प्रसाद नेत असतो. सध्या रोज दीड ते दोन लाख लाडूंची विक्री होत आहे. कार्तिकी एकादशीला येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन मंदिर व्यवस्थापन समितीने लाडू निर्मिती केंद्रात १४ नोव्हेंबर पासून हे लाडू बनविण्याचे काम सुरू आहे.
यात्रा काळात १० ते १२ लाख भाविक येत असल्याने लाडू निर्मितीला अगोदरच सुरुवात करण्यात आली असली, तरी मोठा ताण प्रशासनावर आहे.
सध्या मंदिर समिती स्वतः लाडू बनवित असून भाविकांना दर्जेदार लाडू प्रसाद देण्याचा समितीचा प्रयत्न आहे. मागणी वाढल्यास गरजेनुसार जादाचे लाडू बनविण्याची तयारी केली असल्याचे मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.