नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगरपालिकेची सिटी लिंक बस सेवा पुन्हा विस्कळीत झाली आहे. ४५० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. यापूर्वी तीन महिन्यापासून पगार थकल्यामुळे संप करण्यात आला होता. आता एक महिन्याचे पगार व दोन वर्षाचा बोनस मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे. त्यामुळे तपोवन डेपोमधील ९१ बस डेपोतून निघाल्या नाही.पण, नाशिकरोड बस डेपो पूर्णपण चालु असल्याची माहिती सीटीलिंक बस प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे बस धावण्याचे प्रमाण कमी आहे.
हे आंदोलन करतांना बस कर्मचा-यांनी काही मागण्या सुध्दा केल्या आहे. त्यात एसआय व पीफचे सात आठ महिन्यांपासून पैसे भरलेले नाही ते लगेच भरावे. दोन वर्षांपासून पगार वाढ झालेली नाही ती करावी, त्याचप्रमाणे विनातिकीट प्रवास करणा-याला ३६४ रुपये दंड केला जातो, मात्र तो दंड वाहकाला तीन ते पाच हजार केला जातो तो बंद करावा, एस आयचे पैसे भरले नसल्याने मिळत नाही उपचार असेही बस कर्मचा-यांचे म्हणणे आहे.
पहाटे चार वाजेपासूनच तपोवन मध्ये असलेल्या बस डेपोतून एकही गाडी रस्त्यावर धावणार नाही असा पवित्रा कर्मचा-यांनी घेतला. मागणी पूर्ण न झाल्याने अद्याप पावेतो हे सहावे आंदोलन आहे. बसची संख्या कमी झाल्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले आहे.