इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारत आणि बांगलादेश दरम्यान व्यापार संबंधी संयुक्त कार्यगटाची १५ वी बैठक बांगलादेश मधील ढाका येथे पार पडली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाचे सहसचिव विपुल बन्सल आणि बांगलादेशच्या वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव नूर मोहम्मद महबुबुल हक या बैठकीचे सह-अध्यक्ष होते.
संयुक्त कार्यगटाच्या १५ व्या बैठकीत बंदरांवरील निर्बंध हटवणे, सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार सुरू करण्यासंबंधी प्राथमिक काम , मानकांचे सुसूत्रीकरण, मानकांना परस्परांची मान्यता, बांगलादेशला आवश्यक वस्तूंचा पुरवठा, रस्ते आणि रेल्वे संबंधी पायाभूत विकास , मल्टी-मॉडल वाहतुकीद्वारे प्रादेशिक संपर्क व्यवस्था आणि लँड कस्टम स्टेशन्स / इंटिग्रेटेड चेक पोस्ट्स, बॉर्डर हाट इत्यादींमध्ये पायाभूत सुविधांचा विकास / मजबूतीकरण यासारख्या आदी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली.
दोन्ही देशांनी आर्थिक सहभाग, प्रादेशिक सहकार्य आणि शाश्वत विकास अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि ही द्विपक्षीय बैठक यशस्वीरित्या संपन्न झाली. भविष्यात व्यापार संबंधांना चालना देण्यासाठी आणि परस्पर समृद्धीसाठी अनेक संधी असल्याचा पुनरुच्चार उभय देशांनी केला.
भारत आणि बांगलादेश दरम्यान व्यापार संबंधी संयुक्त कार्यगटाच्या बैठकांचे आयोजन दरवर्षी समानता आणि परस्पर हिताच्या आधारे व्यापार संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य , प्रोत्साहन, सुविधा, विस्तार आणि दोन्ही देशांमधील व्यापारात वैविध्य आणण्यासाठी नव्या संधी शोधण्यासाठी केले जाते. या बैठका व्यापारातील अडथळे दूर करून, सीमाशुल्क प्रक्रिया सुलभ करून, सुरळीत सीमापार व्यापार सुलभ करण्यासाठी पायाभूत सुविधा , लॉजिस्टिक्स आणि पारगमन सुविधांमध्ये सुधारणा करून द्विपक्षीय समस्यांचे जलद निराकरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी व्यापार सुलभ करण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. भारताने १७ मे २०२२ च्या परिपत्रकाद्वारे कोणत्याही इनलँड कंटेनर डेपो मध्ये सीमाशुल्क मंजुरी सुविधेसह बंद कंटेनरमधून बांगलादेशातून रेल्वेद्वारे भारतात निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. बांगलादेशने चट्टोग्राम आणि मोंगला बंदराच्या वापराबाबत तसेच विविध लँड कस्टम स्टेशन्स मधून व्यापार करण्यात येणाऱ्या वस्तूंची संख्या वाढवण्यासंबंधी करार यशस्वीरित्या सुरू झाल्याची माहिती दिली.