इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुका आता काही महिन्यावर येऊन ठेपल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहे. त्यात मनसेने सुध्दा जोरदार तयारी सुरु केली असून त्यासाठी एक अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुकीत मनसे किती जागा लढवणार आहे? अशी सर्वांनाच उत्सुकता आहे. या अहवालाप्रमाणे मनसे २० जागा लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत मनसेने लोकसभा निवडणुकीत थेट उमेदवार देणे टाळले होते. पण, आता मनसे या निवडणुकीत उतरणार असल्यामुळे अनेक पक्षांचे गणित मात्र बिघडणार आहे.
हा अहवाल राज ठाकरे यांच्याकडे देण्यात आला आहे. यासंदर्भात लोकसभा मतदारसंघ निरीक्षकांची राज ठाकरे उद्या बैठक घेणार आहेत. मनसे पुणे लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. याठिकाणी उमेदवारही ठरला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी पुण्याचे वारंवार दौरे केले आहेत. अमित ठाकरे यांच्याकडे पुणे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
राज्यातील २० लोकसभा मतदारसंघाचा हा अहवाल आहे. मनसेने लोकसभा निवडणूक लढवावी, अनेक भागांत पक्षाला चांगला प्रतिसाद असल्याचे मत निरीक्षकांनी या अहवाल व्यक्त केले आहे. आता हा अहवाल आल्यानंतर लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात राज ठाकरे बुधवारी बैठक घेणार आहेत. लोकसभा मतदारसंघ निरीक्षकांची ही बैठक असून दोन दिवसांत आढावा घेवून राज ठाकरे लोकसभा निवडणुकीची रणनीती आखणार आहेत. या बैठकीत मतदार संघातील संभाव्य उमेदवार, त्यांना अनुकूल असणारे वातावरण आदींबाबत चर्चा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राज्यात लोकसभेच्या एकुण ४८ जागा आहे. त्यापैकी २० जागा मनसेने लढवण्याचे निश्चितकेले तर उर्वरीत २८ मतदार संघात काय भूमिका घ्यायची यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.