इंडिाया दर्पण ऑनलाईन डेस्क
बिहारमध्ये मधेपुरा जिल्हाधिकाऱ्यांच्या कारखाली चिरडून तीन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. विशेष म्हणजे या अपघातानंतर गाडीतील कर्मचारी दुचाकीवरून पळून गेले.
जिल्हाधिकाऱ्यांची गाडी मधेपुराकडे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या मजुरांना गाडीची धडक बसली. या वेळी एक मजूर, महिला व बालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीची तोडफोड केली.
या अपघातात जखमींना उपचारासाठी दरभंगा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, त्यात एकाचा मृत्यू झाला. या अपघातात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात २७ वर्षीय गुरिया देवी आणि तिची सात वर्षांची मुलगीदेखील सामील आहे. रुग्णालयात मृत्यू झालेल्या मजुराचे नाव अशोक सिंग असे असून तो राजस्थानचा आहे. याप्रकरणातील दोषींना अटक करून पीडितांना भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.