इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील आरोपी आणि ड्रग्स माफिया ललित पाटील याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी न्यायालयात गोपनीय अहवाल सादर करण्यात आला. त्यात ललित पाटील याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, ललित पाटीलला मदत केलेल्या दोन पोलिसांना नोकरी गमवावी लागली आहे.
अमली पदार्थ तस्कार प्रकरणात आणखी चार जणांची नावे उघड झाली. त्यातील इम्रान शेख उर्फ अतिक अमीन खान आणि रहिश्चंद्र पंत यांना पोलिसांनी अटक केली. या दोघांसह अकरा जणांवर ‘मोक्का’नुसार कारवाई करण्यात आली आहे. मेफेड्रोन ड्रग्सची निर्मिती, ड्रग्सची साठवण, ड्रग्सचे वितरण ही माहिती तपासात उघड झाली आहे. त्यात प्रत्येकाचा सहभाग स्पष्ट झाला आहे. यानंतर ललित पाटील, अरविंद लोहरे, भूषण पाटील, जिशान शेख, राहुल पंडित, इम्रान शेख, शिवाजी शिंदे, हरिश पंत यांची पोलिस कोठडी २४ तारखेपर्यंत वाढवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन पोलिसांवर मोठी कारवाई केली आहे. नाथ काळे आणि अमित जाधव या दोघांना पोलिस खात्यातून बडतर्फ केले आहे. हे दोघे पोलिस ललित पाटील प्रकरणात चौकशीत दोषी आढळले. यापूर्वी या दोघांना निलंबत करण्यात आले होते; मात्र आता थेट खात्यातून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे.