पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिलीपराज प्रकाशनाच्या ५२ व्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित सोहळ्यात यंदाचा ‘दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ ग्रंथ वितरक नाशिक येथील ज्योती स्टोअर्सचे प्रमुख वसंत खैरनार यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती दिलीपराज प्रकाशनाचे मधुर बर्वे आणि मोहित बर्वे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविली आहे.
यावेळी दिलीपराज प्रकाशनाचे लेखक एकनाथ आव्हाड यांना यंदाचा बालसाहित्यासाठीचा ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे आणि प्रसिद्ध लेखक आणि संगीतकार डॉ. आशुतोष जावडेकर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी दिलीपराज प्रकाशनातर्फे प्रकाशित रविंद्र शोभणे यांच्या ‘प्रवाह’ आणि ‘साक्षेप’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम मंगळवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता एस. एम. जोशी सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे होणार असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन दिलीपराज प्रकाशनाचे मधुर बर्वे आणि मोहित बर्वे यांनी केले आहे.