इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईतील हवा खराब झाल्यामुळे उच्च न्यायालयाने राज्य सरकारची चांगलीच कानउघा़डणी केली होती. विकासकामांपेक्षा नागरिकांचे जीवन महत्वाचे आहे. नागरिकांचे जीव धोक्यात येणार असतील तर सर्व विकास कामे थांबवू, अशा असा इशारा न्यायालयाने दिल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी रस्ते पाण्याने धुवून हवेतील प्रदूषण कमी करण्याचे कामे सुरू झाली आहेत. या कामाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे पाच वाजताच रस्त्यावर उतरले.
मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत कारवाईचे आदेश दिले. शिंदे पहाटेच वर्षा या निवासस्थानाहून निघाले. त्यांनी मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपायोजनाची पाहणी केली. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, की मुंबईत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी गरज भासल्यास कृत्रिम पाऊस पाडणार आहे. त्यासाठी दुबई येथील एका कंपनीशी करार करण्यात येणार आहे.
हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मोकळ्या जागांवर झाडे लावण्यात येणार आहे. अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना प्रत्यक्षात आणली जाणार आहे. कचराही रोज उचलला जात आहे. संपूर्ण बीच स्वच्छता करण्यासाठी एक टीम लावण्यात येणार आहे. मुख्य रस्तेच नाहीत, तर आतले छोटे रस्तेही साफ करण्याची सूचना दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.