इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचीच नव्हे, तर पदाधिकाऱ्यांचीही प्रतिज्ञापत्रे बोगस असल्याचा आरोप शरद पवार गटाचे वकील मनु सिंघवी यांनी केल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यावर नाराजी व्यक्त केली. मागचाच युक्तिवाद पुन्हा का करीत आहात, असा सवाल करीत नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, अजित पवार यांच्या अध्यक्ष निवडीलाच शरद पवार गटाने आक्षेप घेतला. आता पुढील सुनावणी ही २४ नोव्हेंबरला होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, पक्षावर दावा कुणाचा याची सुनावणी निवडणूक आयोगात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरू असलेल्या सुनावणीसाठी शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. अजित पवार गटातर्फे पार्थ पवार निवडणूक आयोगात उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस कुवर प्रताप सिंह हे शरद पवार गटाकडे आहेत, तसे प्रतिज्ञापत्रकही त्यांनी दिले आहे. असे असताना अजित पवार गटाकडून त्यांची खोटी सही करून त्यांचे बोगस प्रतिज्ञापत्रक जमा करण्यात आले असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.
शरद पवार गटाच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद अजित पवार गटाकडून खोडून काढण्यात आला. शरद पवार गटाकडून वेळकाढूपणा केला जात आहे, त्यामुळे ही केस निकाली काढावी अशी मागणी अजित पवार गटाने केली. शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी अजित पवार यांनी प्रस्तावक म्हणून सही केली होती. मग दहा महिन्यात नेमके काय झाले, की त्यांनी अध्यक्षपदी दावा केला असा सवाल सुनावणीच्या वेळी विचारण्यात आला.
अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष कधी झाले? अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राष्ट्रीय अधिवेशन कधी घेतले? अध्यक्षपदासाठी त्यांनी अर्ज कधी केला ती तारीख काय होती? अध्यक्षपदाच्या निवडी वेळी निवडणूक निर्णय अधिकारी कोण होते? असे प्रश्न शरद पवार गटाच्या वकिलांनी अजित पवार गटाला केले. अजित पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडी बाबतच्या बैठकीचे कव्हरेज कोणत्या चॅनेलवर दिसले, असा सवाल शरद पवार गटाकडून करण्यात आला.