सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेळोवेळी सुचना वजा ताकीद देऊनही पक्ष शिस्तीचा भंग करणे न थांबविल्याने आज अखेर शिवसेनेचे सिन्नर तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले यांनी प्रसिद्धीपत्रक काढुन शरद शिंदे यांची पक्षातुन हकालपट्टी केली आहे. सतत पक्षाच्या शिस्तीचा भंग करणाऱ्या शिंदे यांची आज हकालपट्टी केल्याने तालुक्यातील शिवसैनिकामंध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापुढे शिंदे यांनी पक्षाच्या विरोधात वा पक्षनेत्यांच्या तसेच पदाधिकाऱ्यांच्या विरोधात काही वक्तव्य केल्यास शिवसेना स्टाईलने त्यांना धडा शिकवणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले यांनी दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपुर्वी पक्षाने सिन्नर तालुका अध्यक्षपदी शरद शिंदे यांची नियुक्ती केली होती. असे असले तरी शिंदे यांनी पक्षबांधणीत सतत उदासिनता दाखविलेली आहे. पक्षबांधणी आणि पक्षविस्ताराकडे शिंदे यांचे सतत दुर्लक्ष होते. याउलट शिंदे यांनी पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनीधी यांच्याविरोधात वक्तव्य करून पक्ष अडचणीत आणण्याचे काम केले.
यामुळे गेल्या तीन – चार महिन्यांपासुन शिंदे यांच्याविरोधात सिन्नर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. याची गंभीर दखल घेत आज शिवसेनेने शिंदे यांची हकालपट्टी केली आहे. शिंदे यांच्या हकालपट्टीच्या प्रसिद्धीपत्रकावर जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले सहसंपर्क प्रमुख, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, जिल्हासंघटक योगेश म्हस्के या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. संपर्कप्रमुख जयंत साठे, सहसंपर्कप्रमुख गणेश कदम आदि मान्यवरांशी चर्चा करून लवकरच सिन्नर तालुकाध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे.