इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर आणि पुणे येथील आयकर विभागाच्या पथकाने काँग्रेसचे धुळे येथील आमदार कुणाल पाटील यांच्या सुतगिरणीवर छापा टाकला आहे. गेल्या ३६ तासांपासून चौकशी सुरू असून आजही चौकशी सुरू राहणार आहे. या चौकशीबाबत तपास यंत्रणेकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील हे अध्यक्ष असलेल्या येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीवर आयकर विभागाच्या पथकाने शनिवारी पहाटे हा छापा घातला. हा छापा टाकल्यानंतर सूतगिरणी व्यवस्थापनासह काही भ्रमणध्वनींसह इतर संपर्क यंत्रणा खंडित करण्यात आली आहे. पथकाने हा परिसर पोलीस बंदोबस्तात ताब्यात घेतला. पाटील यांच्याकडे नऊ वर्षांपासून सूतगिरणीचे अध्यक्षपद आहे. धुळे तालुक्यातील मोराणे शिवारात ही सूतगिरणी आहे.
या छाप्यानंतर आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की, सूतगिरणीवर कोणत्या संस्थेने छापा टाकला, याची माहिती नाही. गिरणीचे लेखापरीक्षण झाले असून त्यात कुठलाही दोष आढळून आलेला नाही. या छाप्यामागे राजकीय हेतू असेल असे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाटील आ. कुणाल पाटील यांच्याकडे नुकतीच विदर्भातील अमरावती व नागपूर लोकसभा मतदार संघाची जबाबदारी सोपवली आहे. धुळे जिल्ह्यात काँग्रेसतर्फे निवडून आलेले कुणाल पाटील हे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे त्यांना अडचणीत आणण्यासाठी हा छापा टाकल्याचे बोलले जात आहे.