इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तरकाशीतील बोगद्यात ४१ जण अडकून आठ दिवस झाले आहेत. बचावकार्य सुरूच आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बोगद्याची पाहणी केल्यानंतर सांगितले, की आता सहा पर्यायांवर काम सुरू असून या संपूर्ण ऑपरेशनला आणखी दोन ते अडीच दिवस लागू शकतात.
उत्तरकाशीमध्ये १२ नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी सुमारे ३० मीटर बांधकाम सुरू असलेला बोगदा सिल्क्यरा बाजूच्या तोंडाच्या २७० मीटर आत कोसळला आणि तेव्हापासून ४१ कामगार त्यात अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. कामगारांसाठी ‘एस्केप पॅसेज’ तयार करण्यासाठी रविवारी ड्रिलिंग स्थगित ठेवण्यात आले. अडकलेल्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी भंगारात आणखी एक मोठी व्यासाची पाइपलाइन टाकली जात आहे. लहान मशिन बदलण्यासाठी आणलेले अमेरिकन आगर मशिन शुक्रवारी दुपारी ड्रिलिंग दरम्यान कठीण पृष्ठभागावर आदळल्याने बंद पडले. तोपर्यंत मशिनने २२ मीटर भंगारात खोदून चार सहा मीटर लांबीचे पाईप टाकले होते आणि पाचवा पाईप टाकण्याची प्रक्रिया सुरू होती.
गडकरी म्हणाले, की जेव्हा अमेरिकन ऑगर मशीन मऊ मातीत ड्रिलिंग करत होते, तेव्हा ते व्यवस्थित काम करत होते; परंतु कठीण खडकात समस्या निर्माण होऊ लागल्या. मशीनवर जास्त दाब द्यावा लागल्यानंतर कंपन निर्माण झाले आणि सुरक्षेच्या कारणास्तव ते बंद करण्यात आले. कामगार बोगद्याच्या आत फिरू शकतील, अशा ठिकाणी अडकले आहेत. त्यांच्याकडे मोकळी जागा, वीज, अन्न, पाणी आणि ऑक्सिजन आहे; मात्र त्यांना लवकर काढले नाही तर धोका वाढू शकतो. याशिवाय कामगारांना अनेक प्रकारच्या आजारांनाही सामोरे जावे लागू शकते.
राज्य आपत्ती व्यवस्थापन सचिव रणजीत कुमार सिन्हा यांनी सिल्क्यरा येथे पत्रकारांना सांगितले, की बोगदा खोदण्यासाठी आणि त्यात पाईप टाकण्यासाठी आगर मशीन पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. अडकलेल्या लोकांपर्यंत अन्न पोहोचवणाऱ्या पाईप व्यतिरिक्त आणखी एक मोठा व्यासाचा पाईप ४२ मीटर खोल ढिगाऱ्यात टाकण्यात आला आहे जेणेकरून जीवनावश्यक वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील.