इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आणि त्यावरील मालकी यावर आज दुपारी निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. सलग तीन दिवस ही सुनावणी चालणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणाची याबाबत निवडणूक आयोग दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेणार आहे. निवडणूक आयोग शिवसेनेप्रमाणे निर्णय घेणार, की शरद पवार गटाने केलेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनात्मक तरतुदीचा आधार घेऊन निर्णय देणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
गेल्या वेळच्या सुनावणीच्या वेळी शरद पवार गटाच्या ॲड. मनू सिंघवी यांनी अजित पवार गटाकडून दाखल केलेल्या सुमारे २० हजार प्रतिज्ञापत्रकावर आक्षेप घेऊन ती बोगस असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ही सुनावणी आज होणार आहे. गेल्या वेळेसच्या सुनावणीच्या वेळी स्वतः शरद पवार निवडणूक आयोगात उपस्थित होते.
या सुनावणीत अजित पवार गटाकडून नीरज कौल आणि मणिंदर सिंग हे बाजू मांडत आहेत, तर शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत बाजू मांडत आहेत. गेल्या सुनावणीच्या वेळी अजित पवार गटाकडून पी.ए. संगमा, सादिक अली या दोन्ही केसचा दाखला देण्यात आला होता. यासोबतच शिवसेनेतील सत्ता संघर्षाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या निकालाचाही उल्लेख वारंवार केला होता. त्यामुळे या सुनावणीत आज नेमकं काय होते हे सायंकाळी स्पष्ट होणार आहे.