इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – महाराष्ट्रात सोमवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी’नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात होता आणि त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.५ इतकी मोजली गेली. या भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही.
‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी’नुसार हा भूकंप पहाटे ५.०९ वाजता झाला आणि त्याचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पाच किलोमीटर खाली होता. त्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र महाराष्ट्राव्यतिरिक्त तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र तेलंगणाची राजधानी हैदराबादपासून २५५ किलोमीटर आणि नागपूरपासून २६५ किलोमीटर अंतरावर आहे.
महाराष्ट्रातील हिंगोलीपूर्वी १९ नोव्हेंबरच्या संध्याकाळी अरबी समुद्रातही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी’नुसार, रविवारी संध्याकाळी ६.३६ वाजता अरबी समुद्रात झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ इतकी मोजली गेली. रविवारी नेपाळ आणि जम्मू-काश्मीरमधील डोडा येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमध्ये रविवारी दुपारी ३.४५ वाजता ३.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आणि रविवारी सकाळी ११.३० वाजता जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे २.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.
पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स एकमेकांकडे सरकत राहतात, जेव्हा जेव्हा दोन टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांवर आदळतात तेव्हा घर्षणामुळे ऊर्जा बाहेर पडते आणि ती लाटांच्या रूपात पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचते. त्यामुळे धक्के जाणवतात. या प्रक्रियेला भूकंप म्हणतात.