इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामतीः बारामती येथील विद्या प्रतिष्ठानची बैठक सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बिघडली. तातडीने त्याच ठिकाणी पवार यांची डॉक्टरांनी तपासणी केली. त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र बैठकीला उपस्थित नव्हते. आधी अजित पवारांची तब्येत बिघडली त्यानंतर शरद पवार यांची तब्येत बिघडली आहे. एकीकडे राष्ट्रादीत बंड झाल्यामुळे पवार कुटुंबिय गेल्या काही दिवसांपासून तणावात आहे. त्यात हे आजार आता त्यांच्या पाठीशी लागले आहे.
शरद पवार सातत्याने कुठे ना कुठे दौरे करीत असतात. ८३ वषे वय असताना तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने त्यांचे कार्यक्रम सुरू असतात. दिवाळीला पवार बारामतीत असतात. पवार कुटुंब एकत्रित दिवाळी साजरी करतात. शरद पवार त्यासाठीच बारामतीत आले असताना विद्या प्रतिष्ठानची बैठक बोलवली होती. बैठकीतच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. विद्या प्रतिष्ठान संस्थेची वार्षिक सर्वसाधारण बैठक बारामतीतील व्हीआयटीमध्ये पार पडली. त्या वेळी त्यांना त्रास जाणवला.
या वेळी उपाध्यक्ष अशोक प्रभुणे,खासदार सुप्रिया सुळे, प्रताप पवार, योगेंद्र पवार, सुनेत्रा पवार यांच्या सह अन्य विश्वस्त उपस्थित होते. पुरंदर तालुक्यातील नीरा आणि सासवड येथे होणारे शरद पवारांचा शेतकरी भेटीचे कार्यक्रम आता स्थगित करण्यात आले आहेत.