इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सध्या ठाण्यात दिवाळीपूर्वीच आतषबाजी सुरू झाली असून शहरात काही फुसके बार आले होते जे न वाजताच निघून गेले. दुसरीकडे शिवसैनिकांचे फटाके असे काही वाजले की त्यांना माघार घ्यावी लागली अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंब्रा येथील प्रकारावर जोरदारा हल्लाबोल केला.
शनिवारी मुंब्र्यात ज्या ठिकाणी शिवसेनेची शाखा तोडण्यात आली त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गेले. त्या ठिकाणी हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. दोन्ही गट आमने सामने आल्यामुळे येथे जाण्यास पोलिसांनी ठाकरे यांना मज्जाव केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या विनंतीला मान देऊन दुरुनच शाखेची पाहणी करुन परतले. पण, या गोष्टीनंतर काही वेळाने शिंदे गटाने जोरदार जल्लोष केला. यावेळी फटाक्याची आतषबाजी सुध्दा केली. ठाकरे येण्याअगोदरच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाखेला घेराव घातला होता. उद्धव ठाकरे यांना शाखेपर्यंत पोहोचू न देण्याचा निर्धारही केला होता. त्यामुळे त्यांनी ठाकरे परत गेल्यावर हा जल्लोष केला.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बोचरी टीका करणारी प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी झालेल्या प्रकारावर सविस्तर आपली बाजू मांडत फुसके बार आले होते व न वाजताच निघून गेले अशा शब्दात पलटवार केला.