इंडिया दर्पण ऑनलाईने डेस्क
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दीपावलीच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, “दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर, मी देशवासियांना आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देते.
दीपावली हा आनंदाचा आणि हर्षोल्हासाचा सण आहे. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अन्यायावर न्यायाचा विजय म्हणून हा उत्सव साजरा केला जातो.
विविध धर्म आणि पंथाचे लोक हा सण साजरा करतात आणि प्रेम, बंधुभाव आणि सौहार्दाचा संदेश देतात. हा सण करूणा, सकारात्मकता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. दीपावलीचा सण आपली सद्सद्विवेकबुद्धी प्रकाशमय करतो आणि मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करण्यासाठी प्रेरित करतो.
एक दिवा इतर अनेकांना उजळवू शकतो. त्याचप्रमाणे आपण गरीब आणि गरजूंबरोबर आपला आनंद सामायिक करून त्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणू शकतो.
आपण सर्वांनी हा दिव्यांचा सण सुरक्षितपणे साजरा करूया आणि पर्यावरण संवर्धनात योगदान देत राष्ट्र उभारणीचा संकल्प करूया .”