इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क —
सध्या भारतात सुरू असलेल्या विश्वचषक २०२३ स्पर्धेतला पाकिस्तानचा पुढचा प्रवास आज अधिकृतरित्या संपुष्टात आला. या संघाला सेमी फायनल गाठण्याची संधी होती. परंतु ती केवळ कागदावरतीच मर्यादित होती. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानला चांगला रनरेट राखून जिंकण्याचे आव्हान होते. परंतु, इंग्लंडने उभारलेल्या एका मोठ्या धावसंख्येसमोर पाकिस्तानची फलंदाजी पुन्हा एकदा गडगडली आणि सेमी फायनल गाठण्याऐवजी या संघाला आता मायदेश गाठण्याची वेळ आली आहे.
पाकिस्तानला २८७ धावांच्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक आहे असा बोलबाला सुरू असतानाच नेमका ‘टॉस’ पाकिस्तानच्या विरोधात गेला आणि इंग्लंडने प्रथम फलंदाजी स्वीकारली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या २०२५ च्या आवृत्तीत इंग्लंडला थेट सहभाग हवा असल्यामुळे आणि ‘गत विश्वविजेता’ या नावाची पत राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंनी या सामन्यात अतिशय काळजीपूर्वक कामगिरी केली. डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स आणि अगदी जॉस बटलर, हॕरी ब्रुक या सर्व इंग्लिश फलंदाजांनी आज पाकिस्तानच्या गोलंदाजांना डोके वर काढू दिलेच नाही. शाहीन शाह अफ्रीदी, हरीस रौफ, इप्तिखार अहमद, मोहम्मद वासिम, शादाब खान या तथाकथित चांगल्या गोलंदाजांची गोलंदाजी इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगलीच झोडपून काढली आणि त्यांचा समाचार घेत ५० षटकात ९ बाद ३३७ धावांचा एक मोठा डोंगर उभा केला. या धावसंख्येला उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाची सलामीची जोडी आज पुन्हा एकदा अपयशी ठरली. बाबरच्या खांद्यावर जी जबाबदारी होती ती या सामन्यात देखील त्याला यशस्वीरित्या पार पाडता आली नाही. आगा सलमान या मधल्या फळीतील फलंदाजाचे अर्धशतक वगळता पाकिस्तानतर्फे क्रीझवर कुठलाच फलंदाज तग धरू शकला नाही आणि ४३.३ षटकात सर्व बाद २४४ या धावसंख्येवर पाकिस्तानचा डाव संपुष्टात आला.
त्याआधी आज सकाळी बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात देखील एक सामना पुण्यात रंगला. बांग्लादेश ने अतिशय चांगली फलंदाजी करत ३०६ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलिया समोर ठेवले होते. परंतु एकट्या मिशेल मार्शने १७७ धावांची मजबूत खेळी करून बांग्लादेशच्या गोलंदाजांना आपली विकेट मिळू दिली नाही आणि अखेरीस ऑस्ट्रेलियाने अवघ्या ४५ व्या षटकातच ३०७ धावा करून हा सामना जिंकला.
५ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू असलेली विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यांची फेरी उद्या संपणार असून, या फेरीतले ‘शेवटचे पुष्प’ भारत आणि नेदरलँड हे दोन संघ गुंफणार आहेत. हा डे-नाईट सामना उद्या बेंगळुरू मध्ये खेळला जाईल.