इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क
पोलीस आयुक्तालय हद्यीत नागरिकांची लुटमार, मारहाण व दहशत निर्माण करुन जनजीवन विस्कळीत करणा-या अंबड येथील गुंडावर एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्दतेची कारवाई. आशिर्वाद सिताराम डगळे असे हा गुन्हेगाराचे नावे आहे. त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुनही त्याने गुन्हेगारी कृत्य चालु ठेवुन जनजीवन विस्कळीत केल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी त्यास मध्यवर्ती कारागृह, नाशिकरोड येथे एमपीडीए कायदा १९८१ चे कलम ३(२) अन्वये स्थानबध्द करणे बाबतचे आदेश ९ नोव्हेंबर रोजी जारी केले आहे. २०२३ मध्ये आतापावेतो स्थानबध्दतेची ही १३ वी कारवाई आहे.
अगोदर हद्दपार केले होते
अंबड पोलीस ठाणे हद्दीत आशिर्वाद सिताराम डगळे, वय २१ वर्षे, रा. रुम नं. ११, मोदकेश्वर अपार्टमेंट, – निरामय संकुल, गजानन नगर, अंबड, नाशिक याने त्याची अंबड गांव, पाथर्डी फाटा, त्रिमुर्ती चौक, अभियंता नगर आणि नजीकच्या परिसरात दहशत कायम रहावी यासाठी त्याने सर्वसामान्य नागरिकांना शस्त्रांचा धाक दाखवुन लुटमार व मारहाण करुन लोकांच्या मनात भिती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. त्यास दिनांक ८ एप्रिल २०२२ रोजी नाशिक शहर व नाशिक ग्रामिण जिल्हयातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते.
हे गुन्हे आहे दाखल
आशिर्वाद सिताराम डगळे याचेविरुध्द अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न करणे, नुकसान करून आगळीक करणे, लोकसेवकाने रीतसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा करणे, शांतता भंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारी पात्र धाकदपटशा करणे, बेकायदेशीर धारदार शस्त्र बाळगणे, कि. अॅ. अॅक्ट चे उल्लंघन करणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी ईच्छापुर्वक दुखापत करणे, ईच्छापुर्वक दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव, प्राणघातक शस्त्रानिशी सज्ज होवुन बेकायदेशीर जमावात सामील होणे, दंगा करणे, समान उद्दीष्ट साधण्यासाठी केलेल्या अपराधाबद्दल बेकायदेशीर जमावाचा घटक असणे, लैंगिक सतावणुक करणे, स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने शब्दोच्चार, हावभाव किंवा कृती करणे, प्राणघातक शस्त्रानिशी सज्ज होवुन दंगा करणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.