इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क
चंदीगड: हरियाणामध्ये विषारी दारू प्यायल्याने १९ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. त्यात काँग्रेस नेत्याचा मुलगा आणि जननायक जनता पार्टी नेत्याचाही समावेश आहे.
यमुनानगर आणि लगतच्या अंबाला जिल्ह्यातील मांडेबारी, पणजेतो का माजरा, फुसगढ आणि सारण या गावांमध्ये बनावट दारू पिऊन मृत्यू झाले. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे. या मृत्यूवरून विरोधी पक्षांनी मनोहर लाल खट्टर सरकारवर टीका केली आहे. याआधीच्या अशाच घटनांवरून हरियाणा सरकार धडा घेण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
मृतांमध्ये एका ७० वर्षांच्या वृद्धाचाही समावेश आहे. या घटनेनंतर अंबाला पोलिसांनी बंद कारखान्यात बनावट दारूचे २०० बॉक्स, १४ रिकामे ड्रम आणि अवैध दारू तयार करण्यासाठी वापरलेले साहित्यही जप्त केले.