नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील रिक्षा, टॅक्सी चालक मालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व सेवा बंद ठेवल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. अनेकांना ही सेवा बंद असल्यामुळे मनस्तापही सहन करावा लागला. सिटी बस सुरु असली तरी काही ठिकाणी रिक्षा व टॅक्सीची गरज असते त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
श्रमिक चालक मालक सेनेचे विविध मागण्यांसाठी सकाळपासून हे आंदोलन सुरु केले. या आंदोलनात टॅक्सीचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धरणे आंदोलन केले तर रिक्षा टॅक्सी चालक मालकांनी शहरातील शालीमार परिसरातील पायी मोर्चा काढला. या आंदोलनामुळे त्यांनी आपल्या मागण्याकडे लक्ष वेधले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रमिक सेना संस्थापक सुनील बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा कार्याध्यक्ष भगवान पाठक, जिल्हाध्यक्ष अजय बागुल, मामासाहेब राजवाडे, शंकर बागुल, नवाज सय्यद, राजेंद्र वागले यांच्या प्रमुख उपस्थित हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनातून सिटीलींक बस, ओला उबेर सेवेला विरोध करण्यात आला. यावेळी शासनाकडून प्रवासी भाड्यांमध्ये एसटी महामंडळाच्या बस मध्ये महिलांना ५० टक्के दिव्यांगांना ७५ टक्के व वृध्दांना शंभर टक्के सवलती दिली आहेत. त्याच धर्तीवर रिक्षा टॅक्सची चालकांना शासनाकडून अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात आली. या आंदोलना नंतर सायंकाळी ही सेवा सुरु होणार आहे.
indiadarpanlive