इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : शिवाजी पार्क आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे समीकरण ठरलेले आहे. मागील वर्षी पहिल्यांदा शिवाजी पार्क आणि बीकेसी अशा दोन ठिकाणी दसरा मेळावा झाला. यंदा दसऱ्याला बराच अवधी शिल्लक असला तरी शिवाजी पार्कवर कुणाचा मेळावा होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
शिवसेनेत अभूतपूर्व बंडखोरी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षावरच दावा केला होता. केंद्रीय निवडणूक आयोगात हे प्रकरण पोहोचल्यानंतर शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्यात आले. याविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली. मात्र, त्याआधी दसरा मेळाव्यावरून दोन्ही गट आमने-सामने आले होते. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट आग्रही होता. मात्र, तसे झाले नाही. ठाकरे गटाने दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेतला होता मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी पार्क मैदानासाठी ठाकरे गटाकडून महानगरपालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. एक महिन्यांपूर्वीच हा अर्ज करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे गटानेही शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केला आहे. दोन्ही गटाचे अर्ज आल्याने महानगरपालिका प्रशासन सावध झाले आहे. मागील वर्षीही असाच वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर आता महानगरपालिकेने विधी विभागाकडून अभिप्राय मागितला आहे, असे समजते. त्यामुळे यावेळी कोणाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळते हे पाहावे लागणार आहे.
मागील वर्षी वाद गेला होता न्यायालयात
दरम्यान, गेल्या वर्षी शिवाजी पार्कवर मेळावा कोण घेणार असा पेच निर्माण झाला. हा वाद न्यायालयात गेला. शिवसेना कोणाची याबाबत निर्णय झालेला नव्हता. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली. यंदा मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे. त्यामुळे नेमका काय निर्णय प्रशासन घेत हे पाहावे लागेल. दोन्ही पक्षांकडून अर्ज प्राप्त झाल्याने आता विधी विभागाच्या निर्णयाकडे लक्ष असणार आहे.. शिंदे गटाने बीकेसीवर मेळावा घेतला.
Whose voice will ring at Shivaji Park?