दीपक ओढेकर, नाशिक
चीन मधील हॅंगझाऊ येथे सुरु असलेल्या १९ व्या आशियाई खेळात आजपासून डायव्हिंग या क्रीडा प्रकाराच्या स्पर्धा सुरु होत आहेत. त्या चार ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. नाशिककरांच्या दृष्टीने त्यांना विशेष महत्त्व आहे कारण नाशिकचा सिध्दार्थ बजरंग परदेशी यात तीन मी स्प्रिंगबोर्ड , १० मी हायबोर्ड आणि सिंक्रोनाइज्ड अशा तीन स्पर्धेत भाग घेणार आहें. त्याच्यासह हेमन लंडन सिंग हा दुसरा भारतीय खेळाडूही यात भारतातर्फे खेळणार आहे.
सिध्दार्थ हा मूळचा नाशिक रोड स्विमिंग क्लबचा सदस्य. त्याची प्रगती आणि कौशल्य पाहून त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला पुणे येथील आर्मी स्पोर्ट्स इंस्टीट्यूट येथे जाण्याचा सल्ला दीला. तेथे त्याला भारतातील अव्वल दर्जाचे ट्रेनिंग मिळाले तसेच अव्वल दर्जाच्या स्पर्धकांसह नियमित सराव करायची संधी मिळाली. तिचा त्याने पुरेपूर फायदा करून घेतला आणि २०१४ सालच्या ग्लासगो येथील राष्ट्रकुल खेळात आणि २०१८ च्या जाकार्ता येथील आशियाई खेळात त्याची भारतीय संघात निवड झाली..
आता लागोपाठ दुसऱ्यावेळी आशियाई स्पर्धेत हा २७ वर्षीय राष्ट्रीय विजेता देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे ही नाशिकच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब आहे. तथापि डाइविंग मध्ये भारताने गेल्या ६९ वर्षांत एकही पदक जिंकलेले नाही. यापूर्वी १९५१ आणि १९५४ सालच्या आशियाई खेळात भारताने दोन सुवर्ण आणि तीन कांस्य पदके मिळविली होती.
गेल्या सत्तर वर्षांत चीन, जपान, कोरिया आणि रशियातून वेगळे झालेले आशियाई देश यांची मक्तेदारी मोडून काढण्याची मोठी जबाबदारी आणि आव्हान सिध्दार्थच्या ( हेमन लंडन सिंग च्या ) खांद्यावर आहे .ते तो कसे पेलतो हे आजपासून (संध्याकाळी ५ वा पासून) सुरू होणाऱ्या तीन मीटर स्प्रिंगबोर्ड डायव्हिंग स्पर्धांमध्ये आणि नंतर दिसेलच.
त्यामुळेच सिध्दार्थला पदक मिळण्याची आशा किती आहे असे विचारल्यावर, ५०-५० असे अत्यंत प्रामाणिक उत्तर त्याने दिले. तरीही नाशिकचा पहिला आणि एकमेव खेळाडू आशियाई स्पर्धेत आणि तेही डायव्हिंग सारख्या अतिशय चुरस असलेल्या खेळात भारतातर्फे एकदा नव्हे तर दोनदा निवडला जातो ही नाशिकच्या दृष्टीने अतिशय अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे ..त्याला नाशिकतर्फे शुभेच्छा…..
Nashik’s diving champion Siddharth Pardeshi’s examination from today!