इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – बीएमसीमध्ये झालेल्या कथित कोविड घोटाळ्याबाबत ईडीने मोठा दावा केला आहे. या घोटाळ्यात लाच म्हणून सोन्याची बिस्कीटे, नाणी आणि बरेच काही देण्यात आलाचा दावा ईडीने केला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
कथित कोविड घोटाळ्याबाबत आता ईडीच्या आरोपपत्रात नवीन खुलासा समोर आला आहे. – बीएमसी अधिकारी आणि राजकीय नेत्यांना सोन्याचे बार, सोन्याची बिस्किटे आणि नाणी दिल्याचा दावा ईडीने केला आहे. कोविड काळात २ जम्बो कोविड केंद्र चालवताना झालेल्या अनियमिततेसाठी फर्मच्या भागीदारांच्या व्यवहाराची छाननीत ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात हा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.
ईडीच्या आरोपानुसार, पाटकर यांनी त्यांच्या राजकीय संपर्काचा वापर करत कोविड केंद्राच्या निविदा प्रक्रियेची आधीच माहिती मिळवली आणि एकूण ३२.४४ कोटी रुपयांच्या घोटाळ्यापैकी २.८१ कोटी रुपये त्यांच्या वैयक्तिक खात्यात वळवण्यात आले. सुजित पाटकर यांच्याव्यतिरिक्त आरोपपत्रातील इतर आरोपींमध्ये लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसचे ३ अन्य भागीदार आणि जम्बो कोविड सेंटरचे डॉ. किशोर बिसुरे यांचाही समावेश आहे.
लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसला २०२० मध्ये दहिसर आणि वरळी जम्बो कोविड सेंटरला वैद्यकीय सेवा पुरवण्याचे कंत्राट दिले होते. या घोटाळ्यातील लाईफलाईनचे भागीदार संजय शाह यांनी सोन्याची बिस्किटे, बार, नाणी खरेदी केली. जी सुजित पाटकरांनी बीएमसीचे अधिकारी आणि इतर व्यक्तींना वाटली असा आरोप आहे. पाटकर यांनी बीएमसी अधिकाऱ्यांना रोख आणि मौल्यवान वस्तूही दिल्या होत्या. जेणेकरून ते जम्बो कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांच्या संख्येकडे दुर्लक्ष करतील, शाह यांनी विविध बँक खात्यांमधून सुमारे ६० लाख रुपयांचे सोन्याची बिस्किटे आणि बार खरेदी केले. त्याचसोबत सुजित पाटकर यांच्यामार्फत १५ लाख रोकड बीएमसीच्या कर्मचान्यांना दिली असे आरोपपत्रात म्हटले आहे.
पाटकरांची ३० टक्के भागीदारी
दहिसर कोविंड केंद्रात ५० टक्के कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर ताण पडला. सुजित पाटकर हे लाईफलाईन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिसच्या प्रमुख भागीदारांपैकी एक आहेत. ज्यांनी फर्ममध्ये केवळ १२५०० रुपयांची गुंतवणूक केली होती. पाटकर यांची या कंपनीत ३० टक्के भागीदारी आहे असेही ईडीच्या आरोपपत्रात सांगण्यात आले आहे.
ED’s shocking information about this scam…