इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली – शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात. तसेच नट-नट्यांनी राजकारणाची पायरी चढू नये, असेही बोलले जाते. कारण आतापर्यंत फारच मोजक्या नटांचा राजकारणात टिकाव लागला आहे. इतरांची मात्र ना इकडचा ना तिकडचा अशी अवस्था झाली आहे. अर्चना गौतम हे त्यातलेच नाव आहे. आपल्याला उमेदवारी देणाऱ्या पक्षानेच तिला मारहाण केल्याचा दावा अर्चनाने केला आहे.
अर्चना गौतम हे नाव सौंदर्य आणि मॉडेलिंग विश्वात प्रसिद्ध होते. त्यानंतर तिने चित्रपट, मालिका, म्युझिक अल्बम्समध्ये नशीब आजमावले. अशातच तिला राजकारणात येण्याची इच्छा झाली आणि काँग्रेसने तिचे आनंदाने स्वागतही केले. गेल्यावर्षी उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने तिला हस्तिनापूरची उमेदवारी दिली. त्यात तिला अवघी पंधराशे मते मिळाली होती.
आता शुक्रवारी दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यालयात गेले असता आपल्याला तेथील कार्यकर्त्यांनी हाकलले आणि धक्काबुक्की केली. त्यानंतर कसेबसे सावरून मी तेथून बाहेर पडले, असा दावा अर्चनाने केला आहे. अर्चना गौतम ही तिच्या वडिलांसोबत काँग्रेस कार्यालयात गेली होती. त्यावेळी तिने वडिलांना घेऊन पक्षाच्या कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला जाऊ दिले गेले नाही. तिथे उपस्थित महिलांनी आपल्याला मारहाण केली असे अर्चना गौतमने म्हटलं आहे. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियांका गांधी यांचे अभिनंदन करण्यासाठी आपण कार्यालयात गेल्यावर हा प्रकार घडल्याचे तिने माध्यमांना सांगितले आहे.
इतरांसोबत कसे वागत असतील?
माझ्यासारख्या अभिनेत्रीसोबत काँग्रेस पक्ष असा वागत असेल तर इतरांचे काय, असा सवाल करीत आता मी गप्प बसणार नाही आणि यापुढेही लढाई सुरुच ठेवणार आहे, असे अर्चना गौतमने म्हटले आहे. माझ्यासोबत जो प्रकार झाला तो धक्कादायक होता आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे वर्तन चुकीचे होते असेही तिने म्हटले आहे.
पोलिसांत तक्रार करणार
धक्काबुक्कीचा प्रकार घडल्यानंतर वडिलांनी सावरले आणि त्यानंतर कारमध्ये बसून निघून गेले, असे अर्चनाने म्हटले आहे. अर्चना गौतमचे वडील शनिवारी या प्रकरणात मेरठमध्ये पोलीस तक्रार करणार आहेत. तसेच अर्चना गौतम या प्रकरणात पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार असल्याचे बोलले जात आहे.
This actress was beaten up in the Congress office… Video viral