इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दोन लाख किंमतीची चोरीला गेलेली सोन्याची चेन चक्क म्हशीच्या पोटात सापडल्याची धक्कादायक घटना वाशीम येथे उघडकीस आली आहे. या घटनेने अनेकांचे कुतुहल जागृत केले असून हा प्रकार नेमका घडला कसा, हे जाणून घेण्यासाठी अनेकांची गर्दी होत आहे.
वाशीम येथे राहणाऱ्या एक कुटुंबासोबत घडलेल्या या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या घटनेबात सविस्तर माहिती अशी की, वाशिम येथे राहणाऱ्या एका कुटुंबात ही घटना घडली. गीताबाई आणि त्यांच्या घरातील काही महिला आदल्या दिवशी सोयाबिनच्या शेंगा सोलत होत्या. त्यावेळी शेंगा सोलून झाल्यावर त्यांनी म्हशीला त्याचे टरफल खायला दिले होते. त्यानंतर सकाळी उठल्यावर गीताबाई यांच्या गळ्यातील दोन लाख रुपये किंमत असलेली सोन्याची पोत गहाळ झाली. कोणीतरी आपली पोत चोरली असे त्यांना वाटले.
घरात सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. मात्र, सोन्याची पोत काही सापडत नव्हती. आपली पोत कोणी घेतली असेल. की आपणच चुकून कुठेतरी विसरुन आलोय, असा विचार महिलेच्या डोक्यात सुरू होता. तितक्यात आपण रात्री पोत काढून ती एका ताटात ठेवल्याचे त्यांच्या लक्षात आले. नंतर याच ताटात टरफले ठेवून ती म्हशीला खायला दिली होती हे त्यांना आठवले. म्हशीने टरफलांसह चेनदेखील खाल्ली असावी असे त्यांना वाटले. त्यानंतर त्यांनी म्हशीची सोनोग्राफी केली. यामध्ये म्हशीच्या पोटात सोन्याची चैन असल्याचे समजते.
ऑपरेशन करून काढली चेन
सोनोग्राफीनुसार, म्हशीच्या पोटात चेन असल्याचे आढळताच तिचे ऑपरेशन करुन ती चेन बाहेर काढण्यात आली आहे. मुक्या जनावरांना काही कळत नाही. त्यामुळे पोटच्या मुलाप्रमाणे डोळ्यात तेल टाकून त्यांची काळजी घ्यावी लागते. काळजी न घेतल्यास किंवा दुर्लक्ष झाल्यास अशा घटना घडतात. वाशिममधील या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.