इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : विधानसभचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप लावला आहे. वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार, दानवे हे मराठा असुनही त्यांच्याकडे ओबीसीचे प्रमाणपत्र आहे. वडेट्टीवार यांच्या या आरोपाने आता महाविकास आघाडीतील दोन मोाठ्या नेत्यांमध्येच जुंपली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वडेट्टीवार यांची आक्रमक विधाने संपूर्ण राज्यात गाजताहेत. विशेषत: ओबीसी आरक्षणावरून ते चांगलेच आक्रमक झाले आहे. याचदरम्यान त्यांनी त्यांचा मित्र पक्ष असलेल्या ठाकरे गटातील अंबादास दानवे यांच्यावर आरोप लावला आहे. सरकारकडून सरसकट ओबीसी प्रमाणपत्र वाटण्याचे काम सुरू आहे. ओबीसी आरक्षणाच्या बैठकीत सरकारकडून तोंडाला पाने पुसण्याचे काम झाले. जे सांगतायेत ओबीसी आरक्षणाचा वाटा कुणाला देणार नाहीत म्हणतात, ओबीसी प्रमाणपत्रे देणार नाही म्हणतायेत. परंतु राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मराठा आहेत. त्यांनी ओबीसी प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्रही घेतलंय असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, आतापर्यंत मराठवाड्यात २८ लाख लोकांना पैसे घेऊन जात प्रमाणपत्र देत जात वैधता प्रमाणपत्रेही देण्यात आली. हे काम झपाट्याने सुरू आहे. गुपचूपपणे सरसकट ओबीसी प्रमाणपत्र वाटण्याचे काम सुरू आहे. मग आरक्षणाचा आणि बैठकीचे सोंग सरकार कशाला करत आहे, असादेखील सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे. तसेच आरक्षण संपवण्याची पहिली पायरी यशस्वीपणे पार पाडत आहे. कारण शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्व पदे या सरकारने कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे मंत्रालयातील कक्ष अधिकारीही मनुवादी विचाराचे बसलेले दिसतील. विशिष्ट विचारधारेचे लोक तहसिल कार्यालयात तहसिलदार म्हणून बसतील. संपूर्ण मेरिट डावलून मर्जीतील लोकांना बसवले जाईल. हा संपूर्ण खेळ राज्यात सुरू आहे हे आमच्या ओबीसी नेत्यांना का कळत नाही हा खरा प्रश्न आहे सरकारने काढलेल्या कंत्राटी भरतीच्या जीआरची होळी तरुणांनी करावी असे आवाहनही विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
दानवे म्हणतात,‘आरोप चुकीचे’
वडेट्टीवार यांचे आरोप चुकीचे असल्याचे सांगत अंबादास दानवे म्हणाले,‘ मी कुठलेही जात प्रमाणपत्र घेतले नाही, त्यामुळे जात वैधतेचा संबंध येत नाही. विजय वडेट्टीवार यांनी का आरोप केले त्यांना विचारा. ज्यांच्याकडे वंशावळी, नातेवाईकांचे रेकॉर्ड त्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिलं जातेय. वंशावळीचे प्रमाण असेल तर सर्टिफिकेट मिळते. माझ्याकडे कुठलेही प्रमाणपत्र नाही. मी कुठल्या समाजाचा नेता नाही. मी शिवसेनेचा नेता आहे. मी मराठा, मी ओबीसी असं म्हणणार नाही. माझी जात माझ्याकडे राहील मी सार्वजनिक का करेन. ज्या बातमीत दम नाही त्याला जाब का विचारू.’