इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – राजकीय स्फोटाची आता महाराष्ट्राला सवय झाली आहे. एका रात्रीतून होत्याचे नव्हते होणे, ही म्हण बरेचदा वापरली जाते. पण राजकारण एका रात्रीतून सत्तेचे बारा वाजले, अशी म्हण वापली जात आहे. गेल्या चार वर्षांत असे अनेक प्रसंग आपण बघितले आहेत. आता पंधरा दिवसांत आणखी मोठा राजकीय स्फोट होणार असल्याचा दावा एका आमदाराने केला आहे. विशेष म्हणजे हा दावा करुन एक दिवस उलटले. त्यानंतर त्यावर ब-याच प्रतिक्रिया आल्या. पण, हा दावा खरा ठरतो की तो हवेत विरतो यासाठी पंधरा दिवस वाट बघावी लागेल.
काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात मोठा राजकीय स्फोट होणार असल्याचा दावा अनेक नेत्यांनी केला होता. अजित पवार ४० आमदारांसह राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह आणि शरद पवार यांचा फोटो घेऊन भाजपसोबत सत्तेत सामील झाले आणि हा दावा खरा ठरला. त्यानंतर लवकरच एकनाथ शिंदे घरी बसतील आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे दावे करण्यात येत आहेत. आता यामध्ये आणखी एक मोठा दावा करण्यात आला आहे. बडनेराचे आमदार रवी राणा यांनी हा दावा केला आहे. १५ ते २० दिवसांच्या आत शरद पवार पंतप्रधान मोदींचा साथ देतील आणि महाराष्ट्रात अजित पवार मुख्यमंत्री होतील, असा दावा त्यांनी केला आहे. गणेशोत्सवादरम्यान जिथे जिथे गणरायाचे दर्शन घेतले, तिथे मी हीच प्रार्थना केली आणि आता हा चमत्कार येत्या २० दिवसांच्या आत बघायला मिळेल, असे राणा यांनी म्हटले आहे. रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. अशा परिस्थितीत त्यांनी केलेला दावा किती खरा आणि किती खोटा, हे काळच सांगू शकणार आहे.
देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक
शरद पवार यांनी देशाच्या प्रगतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साथ देणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. काल शहर विकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत, काल विरोधीपक्षनेते असलेले अजित पवार आज उपमुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्रीपद गाजविणारे देवेंद्र फडणवीस आज उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे राजकारणात काहीही शक्य आहे, असेही रवी राणा यांनी म्हटले आहे.