इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिकचे डॉ. सुभाष पवार यांनी नेपाळ देशातील जगातील सर्वात उंच पर्वत असलेल्या एव्हरेस्ट या पर्वताच्या एव्हरेस्ट बेस कॅम्प या ठिकाणापर्यंत गिर्यारोहण केले. एव्हरेस्ट पर्वताची एकुण उंची समुद्रसपाटी पासून ८८४९ मीटर असून त्यापैकी ५३६४ मीटर अंतर पूर्ण केले. या त्यांच्या गिर्यारोहण सफार बाबत डॅा. सुभाष पवार यांनी थरारक अनुभव सांगितला.
डॅा. पवार म्हणाले की, १७ ते २७ सप्टेंबर या कालावधीत हिमालया वंडर या कंपनीतर्फे आम्ही भारतातून १३ जणांचा ग्रुप गेला होता. त्यात नाशिकचा मी एकटाच होतो. काठमांडू या नेपाळच्या राजधानी पासून आम्ही छोट्या विमानाने लुकला या जगातील सर्वात उंचावर असलेल्या हिमालयातील लहानशा विमानतळावर उतरलो व तेथूनच लगेच ट्रेकिंगला सुरुवात केली. सोबत ५ ते ६ किलोची बॅग पाठीशी घेवून हिमालयाचे आम्ही चढ चढत होतो. २४ सप्टेबर रोजी आम्ही एवरेस्ट बेस कॅम्प या बर्फाच्छादित ठिकाणी ५३६४ मीटर उंचीवर पोहोचलो आणि एकच आनंदाचा जल्लोष झाला.
परतीच्या दिवशी २५ सप्टेबर रोजी आम्ही परत एवरेस्ट बेस कॅम्प पेक्षा उंच ५५५४ मीटरवर असलेल्या काला पत्थर या प्रसिध्द पर्वतावर पहाटे ४ वाजताच डोक्यावर हेड लाईट लाऊन चालायला सुरुवात केली. शिखरावर गेलो व तेथून समोरच दिसणाऱ्या बर्फाच्छादित एवरेस्ट पर्वताच्या शिखरावर सूर्योदयाच्या किरणांच्या विविध छटांचे दर्शन घेऊन आम्ही धन्य झालो.
त्यानंतर परतीच्या मार्गी लागलो व तीन दिवस सतत चढ उतारीचा प्रवास करत पुन्हा लुकला या लहानशा विमानतळावर आलो व तेथून काठमांडुला आलो. असा हा एकूण १५१ कि.मी ट्रेकिंगचा थरारक अनुभव आला. उन, वारा, जोराचा पाऊस, जसजसे उंच जावू तसा विरळ हवा व कमी होत जाणारा ऑक्सिजन मुळे चक्कर येणे, डोके दुखणे , दम लागणे असे त्रास , कच्चा व दगड धोंड्यांच्या पाय वाटा यांचा सामना करत हा वेगळ्या विश्वाचा अनुभव मनात साठवल्याचे डॅा. पवार यांनी सांगितले. हा तसा थरारक अनुभव होता. पण, तो वेगळा होता असेही ते म्हणाले.