चंद्रपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातल्या वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने कांद्यावर मिळणारे अनुदान लाटण्यासाठी तब्बल ६५ हजार क्विंटल कांदा खरेदी केल्याचे दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य सरकारने कांद्याचे भाव कोसळल्यानंतर २३ फेब्रुवारी ते मार्च २०२३ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेड मार्फत कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रति टन अनुदान जाहीर केले होते. सरकारने जाहीर केलेले हेच अनुदान लाटण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी आणि काही शेतकऱ्यांनी हा बनाव रचल्याचे उघड झाले आहे.
विशेष म्हणजे वरोरा हा सोयाबीन, कापूस आणि धान उत्पादक तालुका आहे. या तालुक्यात कांद्याचे पीक फक्त ७५ हेक्टरवर होते असे असतांना वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत ६५ हजार क्विंटल कांदा विकला गेल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या ६७६ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारे २ कोटी ३० लाख रुपये अनुदान जमा झाले.
राज्यात नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादकांमध्ये अग्रेसर असतांना विदर्भाच्या वरोरामध्ये हा कांदा कसा पिकवला गेला याचे सर्वांनाच कोडे होते. पण, चारगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक व शेतकरी विनोद चिकटे यांना काही दिवसांपूर्वी अचानक फोन आला आणि त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले पैसे ५ हजार रुपयांचे आमिष दाखवून परत मागण्यात आले. त्यानंतर हा घोटाळा समोर आला. आता या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
676 farmers received subsidy money in bank account without selling onion