अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर या खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात १०० कोटी रुपयाचा अब्रु नुकसानीचा दावा करणार आहे. गेल्या काही दिवसापासून यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या आहे. त्यांच्यात व खासदार नवनीत राणा यांच्यात सध्या आरोप – प्रत्यारोप सुरु आहे. त्यात आता आमदार ठाकूर यांनी नवनीत राणा यांच्या विरुध्द कायदेशीर लढा देण्याचे संकेत दिले आहे.
आमदार ठाकूर आक्रमक होण्याचे कारणही तसे ठरले आहे. खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्याकडून पैसे घेतले. मात्र प्रचार दुसऱ्याचा केला, असे त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर आमदार ठाकूर यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
या आरोपाबद्दल बोलतांना त्या म्हणाल्या की, लोकसभा निवडणूकीच्या काळात जर मला पैसे दिले असतील तर त्याची माहिती निवडणूक आयोगाकडे नाही का ? एवढा मोठा आरोप झाल्यानंतरही राणा दांपत्यावर कारवाई का होत नाही ? ईडी, सीबीआय काय करत आहे ? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
अमरावतीच्या राजकारणात खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात अगोदर शिवसेना नंतर आमदार कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. आता काँग्रेसच्या आमदार ठाकूर यांनी थेट अब्रु नुकसानीचा दावा करणार असल्याचे सांगितले आहे. आता या दाव्यानंतर खा. राणा काय उत्तर देतात हे महत्त्वाचे आहे.
Congress leader Yashomati Thakur will file a claim of 100 crores against Navneet Rana