इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
टीम इंडियाच्या आक्रमक फलंदाजीमुळे रविवारी कटकमधील बाराबती स्टेडियमध्ये इंग्लंडच्या संघाच्या गोलंदाजीचं कंबरडे मोडत भारताने ४४.३ षटकात ६ गडी गमावून सामना जिंकला. इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने २-० ने खिशात घातली आहे. रविवारच्या सामन्यात रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या खेळीमुळे टीम इंडियाचा विजय सोपा झाला. या सामन्यात रोहित शर्माने ७६ चेंडूत शतक ठोकलं.
या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने सावध पण चांगली सुरुवात केली. पण ४९.५ षटकात सर्व गडी गमवत ३०४ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर भारताने आक्रमक फलंदाजी केली. या सामन्यात रोहित शर्माने ८० चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ११९ धावा केल्या. रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली. शुबमन गिल ५२ चेंडूत ६० धावा करून बाद झाला. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने मधल्या फळीत डाव सावरला आणि डाव पुढे नेला. पण अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर यांच्या धाव घेण्यावरून विसंवाद झाला. त्याचा फटका श्रेयस अय्यरला बसला आणि ४४ धावांवर बाद झाला.
विराट कोहली या सामन्यात काही खास करू शकला नाही. त्याने ८ चेंडूंचा सामना केला आणि एक चौकर मारत ५ धावा करून तंबूत परतला. अक्षर पटेल ४१ धावांवर नाबाद राहिला आणि रविंद्र जडेजाने चौकार मारत संघाला विजयी शॅाट दिला.
भारतीय संघाकडून गोलंदाजी सुध्दा चांगली झाली. रविंद्र जडेजाने ३ बळी घेतले. पण,मोहम्मद शमी खूपच महागडा ठरला. त्याने ७ षटकांत ६६ धावा दिल्या.