इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – इंग्लंडमधील अत्यंत प्रसिद्ध असलेल्या मँचेस्टरच्या ओल्डट्रॅफर्ड मैदानावर झालेल्या तिसऱ्या वनडेत ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या भारताच्या विजयाचे नायक ठरले. भारताने इंग्लंडचा पाच विकेटने पराभव केला. ऋषभ पंतने शानदार शतक ठोकत 113 चेंडूत नाबाद 125 धावा केल्या. यात 16 चौकार आणि दोन षटकार आहेत. इंग्लंडने विजयासाठी दिलेले 260 धावांचे लक्ष्य भारताने 42.1 षटकात पूर्ण केले.
भारताने एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. शेवटच्या वनडेत टीम इंडियानं पाच विकेट्स राखून विजय मिळवला. भारताकडून ऋषभ पंतचे शतक झाले तर त्याचवेळी हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू कामगिरी केल्याने या विजयासह भारतानं अनेक विक्रमही आपल्या नावावर केलेत.
विशेष म्हणजे टीम इंडिया 2015 पासून गेल्या आठ वर्षांत द्विपक्षीय वनडे मालिका जिंकणारा इंग्लंडमधील दुसरा संघ आहे. यादरम्यान इंग्लंडने सात संघांविरुद्ध 15 द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळली आहे. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाने 2015 मध्ये इंग्लंडचा 3-2 आणि 2020 मध्ये 2-1 असा पराभव केला होता.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामना ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे खेळला गेला. भारताने पहिला एकदिवसीय सामना 10 गडी राखून जिंकला, तर दुसरी वनडे इंग्लंडने 100 धावांनी जिंकली. भारतीय संघाने तिसरा एकदिवसीय सामना पाच गडी राखून जिंकून एकदिवसीय मालिका 2-1 अशी जिंकली. इंग्लंडचा संघ 259 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारताने 42.1 षटकांत लक्ष्य गाठले.
#TeamIndia #ENGvIND pic.twitter.com/SWYJMoMFOl
— Indian Cricket Team (@IndianCricNews) July 17, 2022
भारताच्या संघाने 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकापासून इंग्लंडविरुद्ध आठ पांढऱ्या चेंडूंची मालिका (ODI आणि T20) खेळली आहे. यापैकी टीम इंडियाने सात मालिका जिंकल्या. केवळ 2018 मध्ये इंग्लंडनं घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत भारताला 2-1 ने पराभूत केले होते. उर्वरित सात मालिका भारताने घरच्या मैदानावर आणि इंग्लंडमध्ये जिंकल्या आहेत.
तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव 45.5 षटकांत 259 धावांत गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात भारताने एका क्षणी 72 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांनी मिळून सामन्याला फिरवले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी रचली. भारताने आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंडविरुद्ध 11 मालिका जिंकल्या आहेत.
विशेष म्हणजे इंग्लंडच्या भूमीवर टीम इंडियाचा हा चौथा एकदिवसीय मालिका विजय आहे. यामध्ये 1986 मध्ये 1-1 असा ड्रॉ देखील समाविष्ट होता. ज्यामध्ये भारताला विजेता घोषित करण्यात आलं. भारतीय संघ आठ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकू शकला. टीम इंडियाने शेवटची वेळ 2014 मध्ये इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका 3-1 ने जिंकली होती. टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तिन्ही फॉरमॅट एकत्र करून सलग सातवी मालिका जिंकली आहे.
वनडेचे वर्ष, यजमान देश, मालिका निकाल
2017 – भारत – भारत 2-1 ने जिंकला
2018 – इंग्लंड – इंग्लंडचा 2-1 ने विजय
2021 – भारत – भारत 2-1 ने जिंकला
2022 – इंग्लंड – भारत 2-1 ने जिंकला
टी 20 चे वर्ष, यजमान देश, मालिका निकाल
2017 – भारत – भारत 2-1 ने जिंकला
2018- इंग्लंड – भारत 2-1 ने जिंकला
2021 – भारत – भारताचा 3-2 असा
2022 – इंग्लंड – भारत 2-1 ने जिंकला.
India Win One Day Series Against England Record History Cricket