इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टी-२० मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणारा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत याला इतिहास रचण्याची संधी आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर सुरू असलेल्या टी-२० मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्मा याला विश्रांती देण्यात आली आहे. कर्णधारपदाची धुरा के एल राहुल याच्याकडे सोपवली. परंतु राहुल दुखापतग्रस्त झाल्याने मालिकेच्या बाहेर गेला आणि ऋषभ पंत याच्या खांद्यावर संघाची जबाबदारी आली. आता ऋषभ पंतला इतिहास रचण्याची संधी मिळाली आहे.
भारतीय संघ रविवारी दक्षिण अफ्रिकेविरुद्धची मालिका खिशात घालण्याच्या इच्छेने मैदानात उतरणार आहे. मालिकेमध्ये ०-२ अशा पिछाडीवर असताना भारतीय संघाने मुसंडी मारत २-२ अशी बरोबरी साधली आहे. आता निर्णायक सामन्यात दमदार कामगिरी करून मालिका जिंकण्याच्या त्वेशाने भारतीय संघ खेळणार आहे. मालिकेत ०-२ असे मागे पडल्यानंतर ऋषभ पंत याच्यावर टीका होत होती. ऋषभला टिकाकारांना प्रत्युत्तर देण्याची ही योग्य संधी आहे. ऋषभ हा अशी एक गोष्ट करणार आहे, जे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीही करू शकले नाहीत.
दक्षिण अफ्रिकेला घरच्या मैदानावर पराभूत करण्याची संधी भारताला उपलब्ध झालेली आहे. आतापर्यंत दक्षिण अफ्रिकेने भारतात भारताविरुद्ध दोन वेळा टी-२० सामन्यांची मालिका खेळली आहे. त्या वेळी एका मालिकेत महेंद्रसिंग धोनी आणि दुसऱ्या मालिकेत विराट कोहली हे कर्णधार होते. या दोघांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
टी-२० फॉरमॅटमध्ये घरच्या मैदानावर दक्षिण अफ्रिकेला पराभूत करण्याची भारताला सुवर्णसंधी मिळाली आहे. २०१५ मध्ये झालेल्या भारताविरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यांच्या मालिकेत दक्षिण अफ्रिकेने २-० असा विजय मिळविला होता. एका सामन्यात पावसाचा व्यत्यय आला होता, हा सामना पूर्ण होऊ शकला नव्हता. २०१९ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली होती. या मालिकेतही एक सामना खेळाल जाऊ शकला नव्हता.
sports cricket india vs south africa rishabh pant record chance ms dhoni virat kohli