नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यात MQ-9B ड्रोन खरेदीचा करार निश्चित झाला आहे. मात्र, सोशल मीडियावरील काही रिपोर्ट्समध्ये दावा केला आहे की, सरकारने ही ड्रोन डील महागड्या किमतीत केली आहे. मात्र, आता सरकारने हे वृत्त खोटे ठरवले असून ड्रोनच्या किमती अद्याप ठरविल्या नसल्याचे सांगितले आहे. असे वृत्त पसरवून ड्रोन खरेदी व्यवहार होऊ न देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सरकारने म्हटले आहे.
संरक्षण मंत्रालयाचे निवेदन
भारतीय संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, संरक्षण अधिग्रहण परिषदेने 31 MQ-9B ड्रोन खरेदी करण्याच्या कराराला मान्यता दिली आहे. या करारांतर्गत हवाई पाळत ठेवणारे १६ ड्रोन आणि सागरी पाळत ठेवणारे १५ ड्रोन खरेदी केले जाणार आहेत. हे ड्रोन तिन्ही लष्करासाठी खरेदी केले जातील. अमेरिकन सरकारने या करारासाठी ३०७२ दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढे अंदाजे मूल्य दिले आहे. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, अमेरिकन सरकारकडून धोरणाला मंजुरी मिळाल्यानंतर ड्रोनच्या किंमतीवर बोलणी केली जाईल.
त्यानंतरच बोलणी
संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, जनरल अॅटोमिक्सने इतर देशांना ड्रोन किती किंमतीला विकले हे पाहिले जाईल. त्यानंतर किंमतीबाबत बोलणी केली जाईल. सोशल मीडियावर अशाच काही बातम्या सुरू आहेत, ज्यामध्ये भारत सरकारने MQ-9B ड्रोनचा सौदा महागड्या किमतीत केल्याचा दावा केला जात आहे. आता सरकारने याचा इन्कार केला असून हे वृत्त दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. आमच्या सुरक्षा दलांच्या मनोबलावर विपरित परिणाम होईल, असे म्हणत दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचा प्रचार करू नका, असे आवाहन सरकारने केले आहे.