ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आता पाकिस्तान संघाचे पुढचे भवितव्य एका अवघड वळणावर येऊन थांबले आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाकडून निसटता का होईना परंतु अत्यंत मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर झिंबाब्वे सारख्या कमकुवत संघासमोर देखील पाकिस्तान संघाची अवस्था तशीच झाली आणि लागोपाठ दुसरा पराभव त्यांना स्वीकारावा लागला.
आता या लागोपाठच्या दोन पराभवानंतर विश्वचषक स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी पाकिस्तान संघाला अनेक ‘दिव्य’ पार पाडावी लागणार आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन संघांचा समावेश या स्पर्धेच्या क्रमांक दोनच्या गटात करण्यात आलेला आहे. येत्या रविवारी भारताचा सामना या गटातील सर्वात बलाढ्य अशा दक्षिण आफ्रिकेबरोबर होणार आहे. भारत ४ गुणांसह गटात आघाडीवर असून पाकिस्तान मात्र २ पराभवामुळे पाचव्या क्रमांकावर आहे. परंतु, पाकिस्तान अजूनही या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठू शकतो. मात्र त्यासाठी त्यांना भारतीय संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे. म्हणजे काय तर, या रविवारी होणाऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर मोठ्या फरकाने विजय मिळवला तरच पाकिस्तानसाठी थोडाफार आशेचा किरण जागृत राहील. थोडक्यात काय तर भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवावा आणि तो देखील मोठ्या फरकाने अशी प्रार्थना करण्याची वेळ आता पाकिस्तान संघावर येऊन ठेपली आहे. आहे की नाही अजब….! परंतु हे क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमध्ये असल्या अजब आणि आश्चर्यकारक गोष्टी नेहमी होत असतात म्हणून तर हा खेळ लोकप्रिय आहे.