नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोस्ट विभागामार्फत ग्राहकांच्या सेवेसाठी “इंडिया पोस्ट पेमेंट बँक” ॲप सेवा सुरू करण्यात आले असून या ॲपच्या माध्यमातून पी.एल.आय आणि आर.पी.एल.आय चे दरमाह हप्ते ऑनलाईन स्वरूपात भरता येणार आहे. ग्राहकांसाठी 24 तास ही सेवा उपलब्ध असल्याने या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, इंडिया पोस्ट पेमेंट बँक ॲप सेवेचा लाभ घेण्यासाठी आय.पी.पी.बी खाते असणे आवश्यक आहे. हे ॲप आपल्या मोबाईलवर कार्यान्वित करण्यासाठी ग्राहकांनी जवळच्या पोस्ट कार्यालय, शाखा किंवा पोस्टमन यांच्याशी संपर्क साधने आवश्यक आहे. तसेच खाते उघडल्यानंतर आपल्या मोबाईल मधील प्ले स्टोअरच्या माध्यमातून इंडिया पोस्ट पेमेंट बँकिंग ॲप डाऊनलोड करावे, त्यातील पोस्ट ऑफिस सर्व्हिस या ऑप्शन मध्ये पोस्ट लाईफ इन्सुरन्स या पर्यायाच्या माध्यमातून ग्राहकांना घरी बसून काही मिनीटांतच भरणा करता येणार आहे.
सदर ॲपच्या माध्यमातून स्टॅण्डींग इन्स्ट्रक्शनद्वारे आपल्या प्रिमियमचा भरणा तसेच ऑटो कटींग देखील करता येणार आहे. याबरोबरच आर.डी, पी.पी.एफ, सुकन्या समृद्धी योजना इत्यादींचाही भरणा या ॲपच्या माध्यमातून करता येणार आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी ग्राहकांनी जवळच्या पोस्ट ऑफिस अथवा आपल्या भागात नियुक्त करण्यात आलेल्या पोस्टमन यांच्याशी संपर्क साधवा, असेही प्रवर डाक अधीक्षक श्री. अहिरराव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.