नागपूर – भविष्यकाळातील आयुष्य सुखाने घालविण्यासाठी आपल्याकडे खूप पैसे असावेत असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु हे म्हणण्यास जितके सोपे वाटते, तितके करण्यास अवघड. इतके पैसे येणार कुठून? लखपती होणे सोपे असले तरी करोडपती बनणे अजिबात सोपे नाही. नोकरी करणारे किंवा असे म्हणूयात की सामान्य नागरिक आपण कोट्यधीश असतो तर किती चांगले झाले असते, याचाच विचार करत असतो.
पण जाणकारांच्या मते योग्य पद्धतीने बचत केल्यास कोट्यधीश होणे इतकेही कठीण नाही. गुंतवणूक करून कोट्यधीश बनण्याच्या अशा अनेक योजना आहेत. त्यापैकीच एक म्हणजे टपाल कार्यालयाची बचत योजना. तुमचे दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचे नियोजन असेल तर पब्लिक प्रॉव्हीडेंट फंड (पीपीएफ) मध्ये गुंतवणूक करणे हा एक योग्य पर्याय आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही २५ वर्षात कोट्यधीश होऊ शकतात.
विशेष म्हणजे टपाल कार्यालयाच्या या बचत योजनेत तुम्हाला ७.१ टक्क्यांचे वार्षिक चक्रवाढ व्याज मिळणार आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे टपाल कार्यालयात खाते असणे आवश्यक आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
या योजनेत दर महिन्यात १२,५०० रुपये म्हणजे वार्षिक १.५० लाख रुपयांची गुंतवणूक करणार असाल तर १५ वर्षांनंतर ४०.७० लाख रुपये इतकी तुमची मॅच्युरिटी रक्कम असेल. १५ वर्षांनंतर तुम्ही गुंतवणूक केलेली रक्कम एकूण २२.५० लाख रुपये असेल. त्यावर वार्षिक व्याजदर ७.१ टक्क्यांच्या हिशेबानुसार १८.२० लाख रुपये व्याज मिळेल.
कोट्याधीश बनण्यासाठी तुम्हाला २५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. दर महिन्यात १२,५०० रुपयांच्या हिशेबानुसार २५ वर्षात तुमची एकूण ३७.५० लाख रुपये गुंतवणूक होईल. मॅच्युरिटी रक्कम १.०३ कोटी रुपये असेल. त्यामुळेच दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक योजनेत आवश्य पैसे गुंतवावेत असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.