नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय टपाल खात्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून केंद्र सरकारच्या सेवा नागरिकांच्या दारापर्यंत नेण्याचा संकल्प केला आहे. यामुळे पोस्ट आता आपल्या दारात येणार असून सर्वसामान्य नागरिकांनाही सर्व सेवासुविधांचा लाभ मिळणार आहे. याबरोबरच चालू वर्षात १० हजार नवी पोस्ट कार्यालये सुरू होणार आहेत. टपाल विभागाचे सचिव अमन शर्मा यांनी ही माहिती दिली आहे. भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) एका परिषदेत ते बोलत होते.
शर्मा म्हणाले, लोकांना त्यांच्या राहत्या घरापासून पाच किलोमीटरच्या आत बँकिंग आणि वित्तीय सेवा मिळाव्यात यासाठी टपाल कार्यालये सुरु करण्यात येत आहे. ही नवी टपाल कार्यालये चालू आर्थिक वर्षात म्हणजेच मार्च २०२३ पर्यंत उघडली जातील. यानंतर भारतातील एकूण टपाल कार्यालयांची संख्या सुमारे १.७ लाख होईल. याशिवाय सरकारी सेवा देण्यासाठी प्रोजेक्ट आणि तंत्रज्ञानावरही विभाग काम करत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून टपाल कार्यालयांच्या आधुनिकीकरणासाठी सरकारने विभागाला ५ हजार २०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. ही १० हजार टपाल कार्यालये सुरू करण्याची परवानगी मिळाली असल्याचेही ते म्हणाले.
ड्रोनद्वारे डिलिव्हरी
गुजरातमध्ये नुकतीच ड्रोनद्वारे टपालाची डिलिव्हरी केली आहे. सरकारने आम्हाला २०१२मध्ये सुरू केलेला आयटी प्रकल्प पुढे नेण्यास सांगितले आहे. टपाल आणि विविध सरकारी सेवा लवकरच घरोघरी पोहोचवल्या जातील. टपाल कार्यालयांमध्ये येण्याऐवजी तंत्रज्ञानाच्या मदतीने सेवा लोकांच्या घरापर्यंत पोहोचवल्या जातील, असेही शर्मा यांनी स्पष्ट केले.
India Post New Offices Will Open in Country Soon