नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक डाक विभागात टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल विमा योजनेसाठी विमा एजंटची 22 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता थेट मुलाखतीद्वारे नेमणूक करण्यात येणार आहे. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रासह स्वखर्चाने प्रवर डाक अधीक्षक नाशिक विभाग यांच्या कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन नाशिक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक यांनी केले आहे.
विमा एजंटसाठी उमेदवार हा इयत्ता 10 वी अथवा समतुल्य परीक्षा पास असावा. उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. त्यास संगणकाचे आणि स्थानिक ठिकाणाचे ज्ञान असणे आवश्यक असून सध्या आयुर्विमा कंपनीचा एजंट नसावा. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संवाद कौशल्य, जीवन विमा बाबत ज्ञान या आधारावर केली जाणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारास रूपये 5 हजार राष्ट्रीय बचत पत्र (NSC) सिक्युरिटी डिपॉझिट स्वरूपात भरणे आवश्यक आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून उमेदवारास तात्पुरत्या स्वरूपाचा परवाना देण्यात येईल. त्यानंतर IRDAI ची परीक्षा पास केल्यानंतर उमेदवारास कायम करण्यात येणार आहे.
वरील पात्रता पूर्ण करीत असलेले बेरोजगार, स्वयंरोजगार तरूण, सेवानिवृत्त सैनिक, पूर्वी विमा प्रतिनिधी म्हणून कामे केलेल्या व्यक्ती, अंगणवाडी कर्मचारी, सेवानिवृत्त शिक्षक, महिला मंडळ सदस्य, बचत गट प्रतिनिधी विमा एजंट साठी मुलाखतीस उपस्थित राहू शकतात. अधिक माहितीसाठी नजीकच्या डाक कार्यालयात संपर्क साधावा असे प्रवर अधीक्षक यांनी कळविले आहे.
india post insurance agent appointment opportunity
nashik interview