इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशमधील भारतीय डाक विभागात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. आझमगढमधील लालबिहारी येथील मृताच्या जीवनावर आधारित ‘कागज’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जीवंत असलेली व्यक्ती कागदोपत्री मृत झाल्याचे दाखविण्यात आले होते. या गोष्टीने नागरिकांचे लक्ष वेधले होते. परंतु गोरखपूरमध्ये याउलट घटना घडली आहे. येथे एक हजार मृतांना जीवंत करून त्यांचे खाते सुरू करण्याचा पराक्रम डाक विभागातील तीन कर्मचाऱ्यांनी केला आहे.
येथील प्रमुख डाकघरासह तीन शाखांमध्ये अनेक वर्षांपासून बंद पडलेली शेकडो खाती सक्रिय करून ५० लाखांहून अधिक रकमेवर हात मारल्याप्रकरणी आता चौकशीतून एक एक बाब उघड होत आहे. अधिकाऱ्यांच्या कृपेने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना प्रणाली व्यवस्थापकाची जबाबदारी मिळाली. त्यांनी अनेक वर्षांपासून बंद असलेल्या खात्यांची एक यादी बनवली. एक हजार खाते त्यांनी सक्रियच केली नाही, तर त्या खात्यात पोस्टमास्टर यांच्या आयडीद्वारे निवृत्तिवेतनाची रक्कम जमा केली.
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रणाली व्यवस्थापक शैलेष याच्याजवळ सर्व शाखांच्या पोस्टमास्टरांचे आयडी आणि त्याचे पासवर्ड होते. या माध्यमातून तो खाते दुसऱ्या शाखांमध्ये स्थानांतरित करून ते सक्रिय करत होता. त्यानंतर त्या खात्यांमध्ये निवृत्तीवेतन आणि व्याजाचे पैसे हस्तांतरित करत होता. सिसवा बाजार शाखेतून दोन खाते मुख्य डाकघर येथे स्थानांतरित करून ते सक्रिय केल्यानंतर एका खात्यावर एटीएम कार्डही जारी केले.
वरिष्ठ पोस्ट मास्टरच्या आयडीद्वारे दोन खात्यांसह इतर दोन खात्यांमध्ये निवृत्तिवेतनाची रक्कम पाठवली. त्याने काही खात्यांमधून रक्कम दुसऱ्या डाकघरातील खात्यात जमा केली. संबंधितांवर दबाव टाकून ती रक्कम काढून घेतली. मुख्य डाकघरातील पाच खात्यांतून त्याने जवळपास १९ लाख रुपये काढले. यामध्ये एटीएम आणि विड्रॉलचा समावेश आहे.
योगायोगाने अनुभाग येथील सीव्हीओ यांनी सहा महिन्यांपूर्वी कुडाघाट डाकघरातून दहा लाखांच्या सरकारी पैशांची अफरातफर पकडली होती. अन्यथा किती वर्षे मृतकांच्या नावावर कर्मचारी निवृत्तिवेतन आणि एमआयएस खात्यांमधील मुदतठेवींच्या व्याजाचा वापर केला असता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी विभागाच्या यूसीआरच्या खात्यात ४० लाख रुपये जमा केले आहेत. परंतु ही रक्कम अडविल्यामुळे कर्मचाऱ्यांचा गुन्हा कमी होण्याऐवजी आणखी वाढतो.
एसएसपीच्या चौकशी पथकाची प्रधान डाकघर प्रणाली व्यवस्थापक यांच्याशिवाय दोन कर्मचाऱ्यांवर संशयाची सुई आहे. या कर्मचाऱ्यांनीच सक्रिय केलेल्या खात्यांना एटीएम कार्ड जारी केले होते. गुरुवारी प्रधान डाकघर यांच्यासह आणखी दोन कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. परंतु अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिलेला नाही. संशयित आरोपींविरुद्धचे सर्व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, त्यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल केला जाणार आहे.