नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील टपाल विभागात ग्राहकांच्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करण्यासाठी 24 मार्च 2022 रोजी दुपारी 4.00 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ग्राहकांनी आपल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी 15 मार्च 2022 पुर्वी डाक अदालत वरिष्ठ अधीक्षक, टपाल विभागाच्या कार्यालयात तक्रार अर्ज सादर करावेत, असे नाशिक टपाल विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, या डाक अदालतीचे आयोजन वरिष्ठ अधीक्षक, नाशिक डाक विभाग, नाशिक मुख्य डाक घराजवळ, त्र्यंबकरोड, नाशिक- 422001 येथे करण्यात आले आहे. ग्राहकांनी पोस्टल सेवेविषयी असणारे तक्रार अर्ज दोन प्रतीत 15 मार्च 2022 पर्यंत सादर करणे आवश्यक असून, आपल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहनही प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी केले आहे. या डाक आदलतीत पंजीकृत टपाल, स्पीड पोस्ट, बचत बँक, मनी ऑर्डर इत्यादींबाबत तसेच नाशिक विभागातील पोस्टल सेवेविषयी असणाऱ्या ज्या तक्रारींचे 6 आठवड्याच्या आत निवारण झालेले नाही व याबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींचीही या डाक अदालतीत दखल घेतली जाणार आहे, असेही शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.