नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी बंपर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध पदांसाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. महाराष्ट्रातील तब्बल २,५०८ पदे भरली जाणार आहेत. अगदी १० वी पास असणाऱ्यानाही या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. चला तर मग… वाट कसली बघताहेत… लागा तयारीला.
देशभरात इंडिया पोस्टमध्ये ब्रँच पोस्टमास्तर (बीपीएम), असिस्टंट ब्रँच पोस्टमास्तर (एबीपीएम) पदांच्या एकूण ४० हजार ८८९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. इंडिया पोस्ट जीडीएस जॉब नोटिफिकेशननुसार इच्छूक आणि पात्र उमेदवार इंडिया पोस्टच्या indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्म एडिट विंडो १७ ते १९ फेब्रुवारीपर्यंत खुली राहील.
अशा आहेत अटी
इंडिया पोस्ट जीडीएस भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी पात्रता आणि अटीशर्ती अन्य स्पर्धा परीक्षांप्रमाणेच आहे. भरतीप्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार कुठल्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून दहावीच्या वर्गात गणिती आणि इंग्रजी शिकलेला असावा. उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षांपर्यंतच असावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार कमाल वयामध्ये सवलत देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्यासाठीचे शुल्क १०० रुपये आहे. सर्व महिला, ट्रान्स वुमन आणि सर्व अनुसूचित जातीच्या उमेदवारांना शुल्कामधून सवलत देण्यात आली आहे.
India Post Bumper Recruitment Job Vacancy