नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून ‘अतुल्य भारत’ संकल्पनेतून २०२७ च्या वार्षिक अंक कार्यक्रमात नाशिक कुंभमेळा टपाल तिकिटास मंजुरी मिळाली आहे.त्याबद्दल छगन भुजबळ यांनी केंद्रीय दळणवळण मंत्रालयाचे मनःपूर्वक आभार मानले आहे.
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम नाही तर त्याला सांस्कृतिक आणि खगोलशास्त्रीय महत्त्व आहे. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आणि ‘अतुल्य भारत’ संकल्पनेतून जागतिक पातळीवर नाशिकचा गौरव करण्यासाठी सिंहस्थ कुंभमेळ्यावर स्मारक टपाल तिकिट जारी करावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
त्यानुसार २०२७ च्या वार्षिक अंक कार्यक्रमात या टपाल तिकिटाला मंजुरी मिळाली आहे. हा निर्णय नाशिक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महत्त्वाला उजाळा देणारा ठरणार आहे.यापूर्वी प्रयागराज कुंभमेळ्यावर टपाल तिकीट प्रसिद्ध झाले होते, त्याच धर्तीवर आता नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याचा ऐतिहासिक ठेवा संपूर्ण देशभर पोहोचणार आहे.