मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यंदा होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारत-पाकिस्तानमध्ये होणारा अहमदाबाद येथील सामना वादात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाकिस्तानने भारतात खेळू नये, अशी भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असल्याचा दावा करणाऱ्या शिंदे सरकारची भूमिका काय असणार हे पाहण्याजोगे ठरणार आहे.
क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद यावर्षी भारताकडे आहे. विश्वचषकातील भारत-पाकिस्तान हा सामना कायमच रोमांचक ठरत आला आहे. बहुप्रतीक्षित या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष राहणार आहे. यंदाही स्पर्धेदरम्यान एक साखळी सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम होणार आहे. भारत-पाकिस्तानचे सामने चेन्नई, कोलकाता, बंगलोर येथे घेण्यात यावे, अशी भूमिका पाकिस्तान क्रिकेट बोर्डने घेतली आहे. अशात हा सामना अहमदाबाद येथेच निश्चित करण्यात आले आहे. तेव्हा शिवसेनेने घेतलेलीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
युतीतील नेत्यांच्या हाती मंडळाची सुत्रे
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह हे बीसीसीआयचे सचिव आहेत. तर आशिष शेलार हे खजिनदार आहे. हे दोघेही भाजप पक्षाशी संबंधित आहेत. राज्यातील युतीमधील एक पक्षाशी निगडित या दोघांविरुद्ध जात शिंदे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची भूमिका कायम ठेवणार की मवाळ धोरण स्वीकारणार हे येणारा काळ ठरविणार आहे.
१५ ऑक्टोबरला रंगणार सामना
वर्ल्डकपमधील टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवार, १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. इतर मोठ्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड २९ ऑक्टोबरला धरमशाला, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड ४ नोव्हेंबरला अहमदाबाद आणि १ नोव्हेंबरला पुण्यात न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका आमनेसामने विश्वचषक स्पर्धेत आमने-सामने येतील. भारतीय क्रिकेट संघ ग्रुप स्टेजमध्ये ९ शहरांमध्ये खेळणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी संघाचे ग्रुप स्टेजमधील सामने पाच ठिकाणी होणार आहेत.
India Pakistan Match Eknath Shinde Politics