नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा ज्वलंत प्रश्न असलेल्या काश्मिर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांच्या गुप्तचर यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची गोपनीय बैठक जानेवारीमध्ये दुबईत झाल्याचे वृत्त आहे. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारताकडून करण्यात आलेल्या हवाई कारवाईनंतर दोन्ही देशांच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता. रॉयटर या वृत्तसंस्थेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगते आहे.
मागच्या दाराने
दीर्घ काळानंतर दोन्ही देशांमधील संबंध सामान्य करण्याच्या दृष्टीने बॅकडोअर डिप्लोमसीअंतर्गत पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात केली आहे. काश्मिर हा दोन्ही देशांदरम्यानचा ज्वलंत मुद्दा कायमच राहिला आहे.
रॉ आणि आयएसआय
या गोपनीय बैठकीत भारतीय गुप्तचर संस्था रॉ आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या अधिकार्यांनी सहभाग घेतला. या बैठकीच्या आयोजनासाठी संयुक्त अरब अमिरात सरकारने मदत केली आहे.
वृत्त निराधार
या गोपनीय बैठकीबाबत भारत आणि पाकिस्तान सरकारने अधिकृतरित्या कोणतेच मत व्यक्त केले नाही. परंतु पाकिस्तानातील संरक्षण क्षेत्राच्या विश्लेषक आयशा सिद्दीकी यांनी मान्य केले की, दोन्ही देशांचे गुप्तचर अधिकारी काही महिन्यांपासून तिसर्या देशाची भेट घेत आहेत. थायलंड, दुबई किंवा लंडनमध्ये अशा प्रकारची उच्चस्तरीय बैठक झालेली आहे. दोन्ही देशांदरम्यान अशा प्रकारच्या गोपनीय बैठका भूतकाळातही झालेल्या आहेत. मात्र सार्वजनिकरित्या दोन्ही देश स्वीकारत नाहीत, असे सिद्दिकी म्हणाल्या.
आव्हाने
दोन्ही देश संबंध सुधारण्याच्या बाजूने आहेत. सीमा वादावरून भारत आणि चीनचे संबंध ताणलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या सीमेवर भारताला कोणताच तणाव नको आहे. तसेच पाकिस्तानची अर्थव्यवस्था गंभीर संकटात रुतलेली आहे. पाकिस्तान त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकी सैनिक माघारी परतल्यानंतर आपल्या पश्चिम सीमेच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानला प्रयत्न करायचे आहेत.