इस्लामाबाद – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद मिळताच भारत अॅक्शन मोडमध्ये आला असून, त्याचे परिणामही पाहायला मिळत आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर चर्चा झाली. त्या बैठकीत पाकिस्तानला निमंत्रण पाठविण्यात आले नाही. यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. अफगाणिस्तानच्या शेजारील देश असूनही बैठकीला निमंत्रित न केल्याबद्दल पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले की, संयुक्त राष्ट्राच्या मंचाचा वापर पाकिस्तानविरोधात खोट्या गोष्टी पसरविण्यासाठी करण्यात आला आहे. आपले म्हणणे मांडण्याची संधी यात देण्यात आलेली नाही. यूएनएससीचा अध्यक्ष भारताच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत १५ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
संयुक्त राष्ट्रात अफगाणिस्तानचे राजदूत गुलाम इसाकजई सुरक्षा परिषदेला संबोधित करताना म्हणाले, तालिबानला पाकिस्तानकडून सुरक्षित आश्रयस्थान, जंगी मशिन्सचा पुरवठा आणि रसदची सुविधा मिळत आहे. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने म्हटले की, सुरक्षा परिषदेच्या सत्रात आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्याची तसेच अफगाणिस्तान शांतीप्रक्रियेवर आपला दृष्टिकोन मांडण्याची संधी दिली जावी, अशी विनंती केली होती. परंतु आमची मागणी मान्य करण्यात आली नाही. उलटपक्षी पाकिस्तानची बदनामी करण्यासाठी या मंचाचा वापर करण्यात आला आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद ऑगस्ट महिन्यासाठी भारताकडे देण्यात आले आहे. अध्यपदाचा कार्यकाळ २ ऑगस्टपासून सुरू झाला. सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य म्हणून भारताचा २ वर्षांचा कार्यकाळ १ जानेवारी २०२१ रोजी सुरू झाला होता. येत्या डिसेंबरमध्ये भारत पुन्हा सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषविणार आहे.